(ठाणे)
ठाण्यातील घोडबंदर येथील कासारवडवली परिसरात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. येथे शेतजमिनीत असलेल्या उघड्या खड्ड्यात एका महिलेचा व तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात हे दोघे मायलेकी असाव्यात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मृतांची ओळख पटवण्याचे तसेच मृत्यूचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
काल मंगळवार, २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ‘द इन्फिनिटी प्रोजेक्ट’ आणि ‘विहंग व्हॅली’जवळील लेबर कॉलनी शेजारील शेतजमिनीतील अडीच फूट खोल खड्ड्यात दोन मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसले. याबाबतची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि आपत्ती प्रतिसाद दल घटनास्थळी दाखल झाले होते.
या पथकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढून कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर शववाहिकेमधून मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. गौरी गणपती विसर्जनाच्या उत्साहात ही घटना समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

