(बोईसर)
तारापूर एमआयडीसी परिसरातील कामगार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बोईसर उड्डाणपुलाजवळील विराज कंपनीमध्ये सोमवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास घडलेल्या अपघातात टायरमध्ये हवा भरताना झालेल्या स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कामगार वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रत्यक्षदर्शी कामगारांच्या माहितीनुसार, कंपनीच्या आत असलेल्या टायर दुकानात ट्रकच्या टायरमध्ये हवा भरली जात असताना अचानक जोरदार स्फोट झाला. या वेळी टायरची लोखंडी रिंग संबंधित कामगाराच्या डोक्याला लागून तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत कामगाराची ओळख मुजाहिद शेख अशी करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांपूर्वी तारापूर एमआयडीसीत झालेल्या वायुगळती दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इतक्या कमी कालावधीत पुन्हा झालेल्या अपघातामुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
स्थानिक नागरिक व कामगार संघटनांनी प्रशासनाकडे कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

