( पुणे )
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्यानं राज्यभर खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा फरार होता, त्याच्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं होत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा कसून शोध सुरू होता. पीडित तरुणी ही स्वारगेटवरुन फलटणला जात होती. तेव्हा आरोपींनी तरुणीला तेथील एक शिवशाही फलटणला जाणारी आहे असं सांगून त्या बसमध्ये जायला सांगितले. तिथेच तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता.
आरोपी दत्तात्रय गाडे चे वय 36 वर्षे इतके असून त्याच्यावर शिक्रापूर इथे गुन्हे दाखल आहेत. तो जामिनावर सुटलेला आरोपी आहे. ड्रोनच्या मदतीनेही पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत होते. घटनेनंतर आरोपी बसने गावी गेला होता. त्याला आजूबाजूच्या परिसरातील काही नागरिकांनी पहिलं असल्याने पोलीस आरोपीच्या गावी त्याचा शोध घेत होते. डॉगस्कॉडच्या मदतीने देखील आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केला जात होता.
या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका होत होती. दरम्यान, या प्रकरणी पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं. बुधवारी संध्याकाळी ससून रुग्णालयानं पोलिसांना वैद्यकीय अहवाल दिला. त्या अहवालात आरोपी दत्ता गाडेनं दोनदा तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली होती.
आरोपी सापडत नसल्याने अखेर पोलिसांना माघारी येण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. दत्ता गाडेच्या शोध मोहिमेला गेलेले पोलीस पथक आणि ग्रामस्थांच्या पथकाला परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अंतिम क्षणी स्वारगेट अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी आरोपीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 70 तासानंतर स्वारगेट येथील अत्याचारातील आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.
आरोपी फरार झाल्यानंतर त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते आणि तो गावातील शेतात लपवून बसला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली होती. त्या दृष्टीने पोलिसांकङून श्वान पथक बोलावून तसेच ड्रोनच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेतला जात होता. त्यानंतर अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीसांच्या हाती लागला.
गेल्या दोन दिवसांपासून भुकेने व्याकुळ आणि पिण्यासाठी पाणी नाही, या अवस्थेने तो बेचैन झाला होता. अखेर पाणी पिण्यासाठी तो आपल्या एका नातेवाईकाकडे आला. मला पश्चाताप झाला आहे, मला सरेंडर व्हायचं आहे, असं म्हणत तो नातेवाईकांकडे रडू लागला होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरामध्ये सापळा रचत त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर शिरूर येथून तीनच्या सुमारास पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं आहे. आरोपीला सध्या लष्कर पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आले असून, आज दुपारी तीननंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.