(पुणे)
पुण्यातून आरोग्य क्षेत्राशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यकृत प्रत्यारोपणासाठी पतीला स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करणाऱ्या पत्नीचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेनंतर पतीचाही काही दिवसांत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे पती-पत्नी दोघांचेही प्राण गेले असून, कुटुंबीयांनी रुग्णालयाविरुद्ध वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.
बापू कोमकर यांना गंभीर आजार होता. त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गंभीर आजारापणामुळे बापू कोमकर यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती. म्हणून त्यांचे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय हॉस्पिटलने घेतला. अशात पतीचा जीव वाचविण्यासाठी पत्नीने पुढाकार घेतला. पत्नी कामिनी कोमकर यांनी पतीला लिव्हर दान करण्याचा मोठा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्ण बापू कोमकर यांच्यावर १५ ऑगस्ट रोजी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी त्यांच्या पत्नी कामिनी यांनी यकृताचा काही भाग दान केला होता. मात्र, शस्त्रक्रियेनंतर बापू कोमकर यांची प्रकृती खालावली आणि १७ ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी कामिनी कोमकर यांना संसर्ग झाला. उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. नागनाथ येम्पले यांनी माहिती देताना सांगितले की, सह्याद्री रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली असून प्रत्यारोपण प्रक्रियेची सर्व माहिती, व्हिडिओ रेकॉर्डिंगसह उपचाराची संपूर्ण नोंद सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, रुग्णालयाच्या निवेदनात सांगण्यात आले की, शस्त्रक्रिया मान्यताप्राप्त वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार करण्यात आली. “कामिनी कोमकर यांच्या प्रकृतीत सुरुवातीला सुधारणा झाली होती. मात्र, नंतर त्यांना सेप्टिक शॉक आणि मल्टी ऑर्गन फेल्युअर झाले. प्रगत उपचार देऊनही स्थिती नियंत्रित करता आली नाही,” असे रुग्णालयाने स्पष्ट केले. तसेच, तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत, या दुःखद काळात शोकाकुल कुटुंबियांसोबत आम्ही आहोत, असे रुग्णालयाने म्हटले आहे.

