(मुंबई)
महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड ठरली असून इंडियन सोसायटी ऑफ व्हॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी (ISVIR) च्या महाराष्ट्र शाखेची 2025–26 या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश मुंडादा (नागपूर) यांच्या देखरेखीखाली बिनविरोध आणि एकमताने पार पडली. या निवडीतून महाराष्ट्रातील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी क्षेत्रातील व्यावसायिक सलोखा आणि संघटनात्मक एकजूट स्पष्ट झाली आहे.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. अविनाश गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे. ते ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे प्राध्यापक तसेच इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सचिवपदाची जबाबदारी डॉ. शिवाजी पोळे यांच्याकडे सोपवण्यात आली असून ते एमजीएम हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे विभागप्रमुख आहेत. उपाध्यक्षपदी डॉ. विवेक उकिरडे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते एल. टी. मेडिकल कॉलेज आणि सायन हॉस्पिटल, मुंबई येथे प्राध्यापक आहेत.
आगामी कार्यकाळातील अध्यक्ष म्हणजेच प्रेसिडेंट-इलेक्ट म्हणून डॉ. यादव मुंडे यांची निवड झाली आहे. ते रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागप्रमुख आहेत. कोषाध्यक्षपदी डॉ. तेजस सदावर्ते (जीएमसी, नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिव म्हणून डॉ. पृथ्वीराज जाधव आणि डॉ. स्वेनिल शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई, नागपूर, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील अनुभवी आणि नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे भौगोलिक आणि वैद्यकीय प्रतिनिधित्व या कार्यकारिणीत साध्य झाले आहे. 1997 साली केवळ 28 सदस्यांपासून सुरू झालेल्या ISVIR संस्थेची आज राष्ट्रीय पातळीवरील सदस्यसंख्या 1,200 हून अधिक झाली आहे.
इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही अत्याधुनिक ‘पिनहोल’ तंत्रज्ञानावर आधारित उपचारपद्धती असून मेंदूतील स्ट्रोक, रक्तवाहिन्यांचे आजार, व्हेरिकोज व्हेन्स तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर विना शस्त्रक्रिया, कमी वेदनादायक आणि कमी कालावधीतील उपचार शक्य झाले आहेत. रुग्णालयात कमी दिवस राहणे, जलद बरे होणे आणि उपचार खर्चात बचत होणे हे या पद्धतीचे प्रमुख फायदे आहेत.
नूतन कार्यकारिणीने पुढील कार्यकाळात प्रशिक्षण, संशोधन आणि उपचार विस्तार या तीन प्रमुख उद्दिष्टांवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी सेवा पोहोचवणे, तरुण डॉक्टरांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे आणि सर्वसामान्य रुग्णांपर्यंत जीवनरक्षक उपचार पोहोचवणे, हा या कार्यकारिणीचा मुख्य अजेंडा असणार आहे. आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि रुग्णकेंद्रित उपचारपद्धती यासाठी ISVIR महाराष्ट्रची नूतन कार्यकारिणी आगामी काळात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

