(पुणे / पिंपरी-चिंचवड)
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फूट उंचीचा भव्य पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून नोंदला गेला आहे. या पुतळ्याची अधिकृत नोंद प्रतिष्ठित ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाली असून, हा क्षण ऐतिहासिक ठरला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे.
भव्य ‘शंभू सृष्टी’सह स्मारक
ब्राँझ धातूपासून उभारण्यात आलेल्या या स्मारकासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून तब्बल ४८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. पुतळ्याभोवती ‘शंभू सृष्टी’ या नावाने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध असा परिसर विकसित केला जात आहे.
ढोल-ताशांचा गजर आणि शिवगर्जना
या महाकाय पुतळ्याच्या पूर्णतेच्या निमित्ताने सोमवारी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान तीन हजार ढोल, एक हजार ताशा आणि पाचशे भगवे ध्वज यांचा गजर झाला. मर्दानी खेळ, कीर्तन, तसेच बाल शिवभक्तांच्या शिवगर्जनांनी वातावरण दुमदुमून गेले. सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या शिवगीतांवर उपस्थितांनी ठेका धरला. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. हा ऐतिहासिक पुतळा उभारणीमुळे मोशी शहराला नवा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख मिळणार आहे.

