( मुंबई )
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया या स्पर्धेत उतरणार असून, इतर संघ देखील टी२० मालिकेनंतर आशिया कपसाठी मैदानात उतरतील. स्पर्धेतील पहिला सामना ९ सप्टेंबर रोजी यूएईत होणार आहे. यजमान देशाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असतानाच भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडू हनुमा विहारीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये संघ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने आंध्र क्रिकेट असोसिएशनकडे (ACA) ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितले आहे. नियमांनुसार, दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी मूळ संघाची परवानगी घेणे आवश्यक असते.
गेल्या वर्षीही विहारीने टीम बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता मात्र तो खरोखरच आंध्रकडून त्रिपुराकडे जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुरा संघाकडून केवळ खेळण्याचीच नव्हे तर कर्णधारपदाची जबाबदारीही त्याच्यावर सोपवली जाऊ शकते.
हनुमा विहारीचे वक्तव्य
क्रिकबझशी बोलताना हनुमा विहारी म्हणाला, “मी संघ बदलाबाबत विचार करत आहे. त्रिपुराकडून मला खेळण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्यानुसार मी NOC साठी अर्ज केला आहे.”

