(दुबई)
आशिया कप 2025 च्या सुपर-4 टप्प्यातील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने 5 गडी गमावत 202 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेनेही 202 धावा करत बरोबरी साधली. मात्र, सुपर ओव्हरमध्ये भारताने बाजी मारत या स्पर्धेतील सलग सहावा विजय मिळवला.
भारताची दमदार फलंदाजी
भारताकडून अभिषेक शर्माने 22 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी करून संघाला विजयी सुरुवात करून दिली. त्यानंतर तिलक वर्माने नाबाद 49, तर संजू सॅमसनने 39 धावा जोडल्या. त्यामुळे भारताने 20 षटकांत 202 धावा उभारल्या. श्रीलंकेकडून चरित असालंका, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुष्मंथा चमिरा आणि महिश तीक्ष्णा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
श्रीलंकेचा संघर्ष
203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कुसल मेंडिस शून्यावर बाद झाला. पण पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणली. परेरा 32 चेंडूत 58 धावा करून बाद झाला, तर निसांकाने 52 चेंडूत शतक ठोकत 58 चेंडूत 107 धावांची खेळी केली. मात्र, तो शेवटच्या षटकात झेलबाद झाला. श्रीलंकेला शेवटच्या षटकात 12 धावांची गरज होती, पण संघ फक्त 11 धावा करू शकला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये भारताची बाजी
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला अर्शदीप सिंगच्या षटकात केवळ 2 धावा करता आल्या आणि दोन विकेट्स गमवाव्या लागल्या. भारताने वानिंदु हसरंगाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवच्या फटक्यामुळे 3 धावा काढत सहज विजय मिळवला.
या विजयासह भारताने सलग सहावा विजय नोंदवला, तर आधीच स्पर्धेबाहेर गेलेल्या श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, हा सामना औपचारिक असला तरी भारतीय संघाने दमदार कामगिरी करत आत्मविश्वास वाढवला आहे. आता 28 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान अशी आशिया कप 2025 ची रोमांचक अंतिम लढत रंगणार आहे.

