(रत्नागिरी / वार्ताहर)
गोव्यावरून सुट्टी संपवून मुंबईकडे निघालेल्या महिला प्रवाशासोबत एका खासगी बसमध्ये गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसच्या क्लिनरने प्रवासादरम्यान दोन वेळा विनयभंग केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. संगमेश्वर येथे झोपेतून उठवण्याच्या बहाण्याने आणि त्यानंतर पोलादपूर येथे गैरवर्तन केल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पीडित महिला छत्रपती संभाजीनगर परिसरातील असल्याची माहिती आहे. ती गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशनच्या एमएच-43-सीके-2981 क्रमांकाच्या खासगी बसमधून प्रवास करत होती. रात्रीच्या प्रवासादरम्यान बसमधील स्टाफकडून आपल्याला त्रास देण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.
संगमेश्वर आणि पोलादपूरमध्ये गैरवर्तनाचा आरोप
महिलेच्या तक्रारीनुसार, बस संगमेश्वर परिसरात असताना तिला झोपेतून उठवण्याच्या बहाण्याने क्लिनरने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलादपूर येथेही पुन्हा विनयभंग केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर महिलेने तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण संगमेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
महिलेने बसच्या स्टाफकडून आपल्याला एकापेक्षा अधिक वेळा त्रास देण्यात आल्याचा आरोप केला आहे. कोलाड येथे बस आली असता, पोलिसांनी या बसला अडवून संपूर्ण हकीकत या महिलेकडून जाणून घेतली. त्यानंतर कोलाड पोलीस ठाण्यात कलम बीएनएस कलम 74 अंतर्गत गैरवर्तन केल्या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर संबंधित बस पोलिसांच्या कारवाईसाठी कोलाड पोलिस ठाण्याकडे वळवण्यात आल्याची माहिती आहे.
महिला सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
या घटनेनंतर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. खासगी बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“लाडकी बहीण” म्हणणे केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता संबंधित महिलेच्या पाठीशी सरकार आणि पोलिसांनी ठामपणे उभे राहावे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. संबंधित बसमधील स्टाफच्या वर्तनाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
रात्रीच्या खासगी बस प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न
या घटनेमुळे रात्रीच्या खासगी बस प्रवासातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक प्रवासी रात्रीच्या प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसचा पर्याय निवडतात. अशा वेळी बसमधील चालक, क्लिनर आणि अन्य कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या उपाययोजना आणि तक्रार निवारण यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास संगमेश्वर पोलिसांकडून सुरू असून, महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

