( नवी मुंबई )
डी. वाय. पाटील स्टेडियमवर रविवारी (३ नोव्हेंबर) खेळवण्यात आलेल्या आयसीसी महिला वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवत इतिहास रचला. २००५ आणि २०१७ मध्ये हातातून निसटलेले स्वप्न हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली अखेर साकार झाले आणि भारताने पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषक जिंकला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ बाद २९८ धावा केल्या. शेफाली वर्मा (८७) आणि दीप्ती शर्मा (५८) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने मजबूत धावसंख्या उभारली. स्मृती मानधनासोबत शेफालीने पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची विक्रमी भागीदारी रचून संघाला भक्कम सुरुवात दिली.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव दीप्ती शर्माच्या अचूक गोलंदाजीसमोर गडगडला. कर्णधार लॉरा वोल्व्हार्डने शतकी खेळी (१०१ धावा) करत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या, मात्र अखेरीस दक्षिण आफ्रिका संघ २४६ धावांवर गारद झाला. दीप्ती शर्माने ५८ धावांसह गोलंदाजीतही चमत्कार घडवला, ५ विकेट्स आणि १ रनआऊट घेत सामना आपल्या ताब्यात घेतला. तिच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने ५२ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. शेफाली वर्मानेसुद्धा फलंदाजीसह गोलंदाजीत दोन निर्णायक विकेट घेतल्या. उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल तिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
या विजयात तीन लेकींनी, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी निर्णायक भूमिका बजावली. अमनजोतने महत्त्वाचे कॅच घेत दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार वोल्व्हार्डला बाद करत सामन्याचा कल बदलला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा क्षण 46 व्या षटकात आला. हे षटक दीप्ती शर्मा टाकत असताना तिसऱ्या चेंडूवर नादिन दे क्लार्कने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी, कर्णधार हरमनप्रीत कौरने मागे धावत जात अचूक वेळ साधत उडी मारत एक उत्कृष्ट झेल टिपला, जो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. हा झेल इतका अविश्वसनीय होता की, यासह दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २४६ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताचा ऐतिहासिक विजय निश्चित झाला.
या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा संघ फायनलच्या बाहेर होता. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील हा सामना तिसऱ्या विश्वविजेत्याचा निर्णय करणारा ठरला आणि अखेर भारतानेच ती सुवर्णकहाणी लिहिली. तब्बल ५२ वर्षांच्या महिला वनडे विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच विश्वविजेतेपद जिंकत क्रिकेटविश्वात नवा अध्याय लिहिला.
या विश्वचषकानं आधीच अनेक विक्रम मोडले आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक धावसंख्येपासून ते शतकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंतचा समावेश आहे. रविवारचा अंतिम सामना अशा सर्व विक्रमांसह, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बक्षीस रकमेनं या सामन्याच्या भव्यतेत भर घातली आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा केली, जी कोणत्याही पुरुष विश्वचषकाच्या रकमेपेक्षा जास्त आहे.
यावेळी, विजेत्या संघाला 4.48 मिलियन डॉलर किंवा अंदाजे ₹41 कोटी मिळतील. याचा अर्थ विजेता संघ अत्यंत श्रीमंत होणार आहे. तसंच उपविजेत्या संघाला 2.24 मिलियन डॉलर किंवा अंदाजे ₹21 कोटी मिळतील. शिवाय, प्रत्येक संघाला आधीच 250,000 रुपये बक्षीस मिळण्याची हमी देण्यात आली होती, तर लीग टप्प्यातील प्रत्येक विजयासाठी 34,314 बक्षीस मिळण्याची हमी देण्यात आली होती. दरम्यान, सेमीफायनलमध्ये बाहेर पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या महिला संघांनाही अंदाजे ₹9.3 कोटी मिळतील.

