(मुंबई)
राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा अधिक सुलभ आणि परिणामकारक पुरवठा व्हावा यासाठी “आपले सरकार” पोर्टलवरील सर्व सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
वर्षा निवासस्थानी सेवासुलभीकरणाबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक तालुक्यात सुरुवातीला १० ते १२ गावांचा क्लस्टर तयार करून स्थानिक गरजेनुसार सेवा पुरवाव्यात. या सेवा वेळेत मिळाव्यात यासाठी समर्पित पथके नेमावीत. पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी तृतीय-पक्ष संस्थांकडून नियमित पडताळणी (ऑडिट) करावी, तसेच नागरिकांना अर्ज प्रक्रियेत कमी कागदपत्रांची गरज भासेल, यासाठी नियोजन करावे.
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, राज्यभर एकसंध अनुभव मिळावा यासाठी सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत. सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिंग व क्लस्टर प्रणाली राबवावी, तसेच डिश डिजिटल सेवा हबचा वापर करावा.
सध्या “आपले सरकार” पोर्टलद्वारे राज्यात एकूण 1001 सेवा उपलब्ध आहेत, त्यापैकी 997 सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांतच 236 नवीन सेवांची भर या पोर्टलवर करण्यात आली आहे.

