(मुंबई)
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे घराण्यातील दोन भाऊ आणि राज्यातील दोन मोठे नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले. त्यानंतर आता पुन्हा एकदा “मत चोरी” च्या मुद्द्यावरून दोघेही एकाच भूमिकेत दिसत आहेत. परिणामी, मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे)–मनसे युती होणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
व्होट चोरीच्या मुद्द्यावर दोघांचे एकमत
अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठ्या प्रमाणात “मतांची चोरी” केल्याचा आरोप केला होता. या आरोपाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर आता राज ठाकरेंनी देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. राज ठाकरे म्हणाले, “राहुल गांधींचे आरोप गांभीर्याने घ्यावेत. विधानसभा निकालात भाजपाला 132 जागा, शिंदेंच्या सेनेला 56 तर अजित पवार गटाला 42 जागा मिळाल्या. एवढं प्रचंड बहुमत मिळूनही त्यांचा जल्लोष कुठेच दिसला नाही. हेच ‘व्होट चोरी’चं निदर्शक आहे. त्यामुळे चौकशी होणे आवश्यक आहे.” राज ठाकरे यांनी यावेळी हेही उघड केले की, “लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी आम्ही शरद पवार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी यांना भेटलो होतो. पण कोणीही तयार झालं नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला.”
युतीचे संकेत?
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे प्रथमच सार्वजनिकरित्या एकत्र आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. यामुळे शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांच्यातील संबंध चांगले होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. आता “व्होट चोरी”च्या मुद्द्यावर दोघांचे एकमत झाल्याने, ही केवळ निव्वळ भूमिका नसून मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील युतीसाठी टाकलेले पाऊल आहे असे मानले जात आहे.
मराठी माणसांच्या मनात दोन्ही भाऊ एकत्र यावेत, अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे. पक्षपातळीवरही सकारात्मक संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांच्या घरच्या दीड दिवसाच्या गणपतीला उद्धव ठाकरे येणार का, हा उत्सुकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर अमित ठाकरे यांनी “सरप्राईज असेल…” एवढेच सांगितले.
हिंदी सक्तीपासून ते व्होट चोरीपर्यंत अनेक मुद्द्यांवर उद्धव-राज ठाकरे यांचे विचार जुळत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी या दोन्ही भावांमध्ये युती होण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.

