(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रमुखपदाची धुरा सध्या अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकली असून, प्रभारी शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते यांच्या ३१ जुलै रोजी झालेल्या सेवानिवृत्तीनंतर तीन दिवस उलटूनही नव्या शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती अथवा पदभाराबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. परिणामी, शिक्षण विभागाचे प्रमुखपद अद्याप रिक्तच असून, प्रशासकीय दिरंगाईबाबत शिक्षक वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
शिरभाते यांनी ३१ जुलै रोजी नियमानुसार सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याच दिवशी अथवा तत्काळ नव्या अधिकाऱ्याकडे पदभार सोपविणे अपेक्षित होते. मात्र, ३ ऑगस्ट उजाडूनही पदभाराबाबत आदेश निघाले नसल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार नेमका कोणाच्या देखरेखीखाली सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण विभागासारख्या महत्त्वाच्या यंत्रणेचे नेतृत्व रिक्त राहिल्याने दैनंदिन प्रशासकीय निर्णय, विविध प्रस्ताव, शालेय कामकाज आणि धोरणात्मक प्रक्रिया यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नवीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय इतका का लांबला, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, हा अतिरिक्त पदभार नेमका कोणाकडे सोपवायचा याबाबत वरिष्ठ स्तरावर अद्याप एकमत झालेले नाही का, की प्रशासकीय पातळीवरील दिरंगाईमुळे निर्णय रखडला आहे, याबाबत शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिक्षण विभागाचे प्रमुखपद दीर्घकाळ रिक्त राहणे ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याची भावना व्यक्त होत असून, विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक व्यवस्थेच्या हितासाठी शासनाने तातडीने नव्या शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करून अनिश्चिततेला पूर्णविराम द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

