(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
देवरुख शहरातील मच्छीमार्केट परिसरातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली असून, खड्ड्यांमुळे सायकलवरून पडून एका लहान मुलाला गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी (२ ऑगस्ट) घडली. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर नगरपंचायतीच्या हलगर्जी कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मच्छीमार्केट परिसरातील रस्ता पावसामुळे अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. दररोज शेकडो नागरिक आणि विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. मात्र, रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांकडे नगरपंचायतीचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रविवारी सायकलवरून जात असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने संबंधित मुलाचा तोल गेला आणि तो रस्त्यावर कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. देवरुख ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
विशेष म्हणजे, या परिसरात वीज खांब असूनही पथदिव्यांची व्यवस्था प्रभावी नसल्याने रात्रीच्या वेळी अंधारात वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. खड्डे आणि अंधार यांचा दुहेरी फटका नागरिकांना बसत असून, एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या रस्त्याबाबत अनेकदा तक्रारी करूनही नगरपंचायतीकडून केवळ आश्वासनांचीच खैरात करण्यात आली आहे. प्रत्यक्षात रस्त्यांची दुरुस्ती आणि पथदिव्यांची व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे नगरपंचायतीने तातडीने लक्ष देऊन खड्डे बुजविणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि पथदिवे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघातांची नैतिक जबाबदारी प्रशासनावरच राहील, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

