(मुंबई)
२ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ चे विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच हा प्रतिष्ठेचा किताब जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा विजय भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला.
या उल्लेखनीय यशाची दखल घेत भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने (रेल्वे बोर्ड) भारतीय संघातील दोन महत्त्वाच्या खेळाडूंना — स्नेह राणा आणि प्रतिका रावल यांना पदोन्नती देण्यास मान्यता दिली आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिकृत पत्रकानुसार, दोघींनाही ७व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार लेव्हल-८ मधील विशेष कर्तव्य अधिकारी (क्रीडा) या गट ‘ब’ राजपत्रित पदावर बढती देण्यात आली आहे. ही बढती आउट-ऑफ-टर्न प्रमोशन (OTP) योजनेअंतर्गत देण्यात आली असून उत्कृष्ट क्रीडा कामगिरीची अधिकृत पावती आहे.
रेल्वे बोर्डाने उत्तर रेल्वेला तातडीने पदोन्नतीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित आदेशांवर आस्थापना संचालक (क्रीडा) तसेच रेल्वे क्रीडा प्रोत्साहन मंडळाचे (आरएसपीबी) सचिव यांच्या स्वाक्षऱ्या असून त्याच्या प्रती राष्ट्रीय रेल्वे क्रीडा संघटनांसह संबंधित खेळाडूंना पाठवण्यात आल्या आहेत.
प्रतिका रावलची धडाकेबाज कामगिरी
प्रतिका रावलने वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावत तिने स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली. एकूण ३९८ धावा करून ती सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या स्थानावर राहिली. तिची सरासरी ५१.३३ इतकी प्रभावी होती. मात्र ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिला सेमी फायनल आणि फायनल खेळता आले नाही. तिच्या जागी शेफाली वर्माला संधी देण्यात आली. तरीही तिने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल आयसीसीने घेतली.
स्नेह राणाची सातत्यपूर्ण गोलंदाजी
अनुभवी अॉलराउंडर स्नेह राणाने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत सात विकेट्स मिळवल्या आणि संघाच्या मोहिमेत निर्णायक योगदान दिले. भारतीय महिला क्रिकेटपटूंनी गाठलेल्या या यशाचा गौरव करण्यास रेल्वे मंत्रालयाचा सन्मान निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे. देशासाठी क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक क्षण निर्माण करणाऱ्या या खेळाडूंना मिळालेली बढती महिला क्रीडापटूंच्या प्रोत्साहनासाठी मोठा पाऊल आहे.

