(खेड)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांना अखेर पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाच्या चर्चांना जोर आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर (राजापूर), संतोष नलावडे (चिपळूण) आणि सुबोध जाधव (माणगाव, रायगड) यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मनसेची अधिकृत कारवाई
मनसेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात नमूद आहे की, संबंधित पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नियम आणि धोरणांचे उल्लंघन करून पक्षविरोधी कारवाई केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.
कोकणातील महत्त्वाचे शिलेदार
राज ठाकरे यांनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केली तेव्हापासून वैभव खेडेकर त्यांच्या सोबत आहेत. कोकणात मनसेची संघटनात्मक उभारणी करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. खेड आणि दापोली परिसरात त्यांचा प्रभाव असून, तरुण वर्गामध्ये त्यांना मोठी लोकप्रियता आहे. 2014 मध्ये खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याआधी ते खेड नगराध्यक्ष होते आणि खेड नगरपरिषद मनसेकडे आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
भाजप प्रवेशाची चर्चा
गेल्या काही महिन्यांपासून खेडेकर भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. दापोलीत झालेल्या महायुतीच्या एका कार्यक्रमात ते व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात महायुतीच्या नेत्यांनी त्यांना खुलेपणाने भाजप प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. खेडेकर यांनी जरी प्रवेशाचे वृत्त नाकारले असले, तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी “भाजप प्रवेश निश्चित” असल्याचे संकेत दिले आहेत.
प्रतिस्पर्धी नेत्यांशी संघर्ष
खेड-दापोली परिसरात शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याशी खेडेकरांचा दीर्घकाळ संघर्ष राहिला. मात्र अलीकडे या संघर्षाला पूर्णविराम देण्यात आला. दापोलीतील एका कार्यक्रमात रामदास कदम यांनी “सर्व मतभेद भैरीच्या पायखाली गाडले” असे जाहीरपणे सांगून वैभव खेडेकरांशी मैत्रीचा हात पुढे केला होता.
मनसेला मोठा धक्का
मनसेच्या राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटकपदाची मोठी जबाबदारी खेडेकरांकडे होती. त्यांच्या हकालपट्टीमुळे आणि संभाव्य भाजप प्रवेशामुळे कोकणातील मनसेची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.