(खेड)
गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्यभरातून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई–गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे.
दरम्यान, नातूनगर गावडेवाडी परिसरात दुपारी अपघात घडला. एमएच ०३ सीएस ९७१३ क्रमांकाची इको कारमधील प्रवासी खवटी रेल्वे स्टेशनजवळ आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी थांबले असता, एमएच १५ जेएन ९९७७ क्रमांकाच्या भरधाव बसने पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात घाटकोपर येथील अजय महादेव पाडेकर आणि मंजुळा महादेव पाडेकर हे दोघे जखमी झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अतिवेग किंवा चुकीची ओव्हरटेकिंग ही शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिकांनी तातडीने जखमींना कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. गणेशोत्सवाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

