(गणपतीपुळे / वैभव पवार)
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड आणि कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे दरवर्षी श्रावणधारण हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार यावर्षी या उपक्रमाची सुरुवात श्रावणधारा या उपक्रमाने झाली. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये याठिकाणी हा उपक्रम अत्यंत वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरा केला. शेवटी या उपक्रमाचा समारोप नुकताच मालगुंड येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर संतोष केळकर यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली बहर वर्षा ऋतुचा या कार्यक्रमाने कवी केशवसुत स्मारक येथे करण्यात आला. या कार्यक्रमात परिसरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खुल्या गटांतील कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
या उपक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत आणि शुभहस्ते आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करत देवी सरस्वती आणि कवी केशवसुत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित कवींनी वर्षा ऋतू, श्रावण, पाऊस इत्यादी विषयांवर आपापल्या कविता सादर करत कार्यक्रमाचा रसास्वाद वाढवला. यावर्षीच्या बहर वर्षा ऋतूंचा या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील अनेक शाळा – हायस्कूलमधील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कविता अत्यंत चांगल्या पद्धतीने सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विविध स्वरूपातील कविता सोप्या सध्या शब्दांत, गाय स्वरूपात स्वरूपात आणि हावभाव करत सादर केल्याने उपस्थितांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत झाली.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील,कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर,सचिव विलास राणे, सहसचिव रामानंद लिमये, कवी केशवसुत स्मारक समितीचे कोषाध्यक्ष तथा कोमसाप मालगुंड शाखेचे सदस्य रविंद्र उर्फ भाऊ मेहेंदळे, सदस्या उज्ज्वला बापट,पत्रकार वैभव पवार यांच्यासह शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक, कवी आणि साहित्यप्रेमी रसिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक आणि काव्य वाचनाचे निवेदन कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे यांनी तर आभारप्रदर्शन सहसचिव रामानंद लिमये यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, सचिव विलास राणे, सहसचिव रामानंद लिमये, युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग प्रमुख अरुण मोर्ये यांनी परिसरातील शाळा, महाविद्यालयात जाऊन या उपक्रमासाठी प्राथमिक फेरी घेत सहभाग वाढविला. तर स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे, अस्मिता दुर्गवळी, अदिती मांडवकर यांनीही विशेष प्रयत्न केले.

