(खेड)
सवेणी नं. १, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील पदवीधर शिक्षक एकनाथ पाटील यांना यावर्षीचा रत्नागिरी जिल्हा परिषदेचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. या यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सवेणी शाळेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
गेल्या सहा वर्षांपासून पाटील सरांनी शाळेत भरीव कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील दोन विद्यार्थी अमेरिकेतील नासा अभ्यासदौऱ्यासाठी निवडले गेले होते आणि त्यांनी नुकताच तो दौरा पूर्ण केला आहे. तसेच तीन विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी मिळाली.
शैक्षणिक उन्नतीसह विविध क्षेत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे. शिष्यवृत्ती मार्गदर्शन, क्रीडास्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, सैनिकी कवायत संचलन, उत्कृष्ट निवेदन, शैक्षणिक उपक्रम, काव्यलेखन, रक्तदान या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांच्या योगदानाची दखल घेत जिल्हा परिषदेकडून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
या सन्मान सोहळ्यासाठी स. तू. कदम (राष्ट्रवादी काँग्रेस दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष), संजयराव जाधव (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), विजय निकम (तालुका उपाध्यक्ष), अशोक शिंदे (माजी सरपंच, सवेणी), मुक्त्यार कावलेकर (माजी सरपंच, सवेणी), उमेश देवरुखकर (उपसरपंच), प्रमोद नगरकर व शिक्षणप्रेमी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ जाधव, पदवीधर शिक्षक गणोजी माने व उपशिक्षक अजय म्हादे उपस्थित होते.

