( खेड /प्रतिनिधी )
मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून नातूनगर (ता. खेड) येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नौशाद नूरमोहम्मद कोंडेकर (वय २२) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नौशाद हा मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास होता. दररोजप्रमाणे लोकलने प्रवास करत असताना मस्जिद बंदर स्थानकादरम्यान त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कोंडेकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
नौशाद हा नूरमोहम्मद कोंडेकर यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूने नातूनगरसह खवटी, तुळशी, मोहल्ला पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी रात्री उशिरा त्याचा पार्थिव मूळगावी नातूनगर येथे आणण्यात आला. त्याच रात्री नातूनगर-मोहल्ला येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दैनंदिन जीवनात मुंबईतील लोकल हा सामान्यांचा अविभाज्य भाग असला, तरी अशा प्रकारच्या अपघातांनी अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. नौशादच्या अकाली निधनाने एक होणारा आधार हरपल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.