(देवरूख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील मौजे कुंभारखणी खुर्द (गावकरवाडी) येथे आज पहाटे बिबट्याला वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले.
गावातील ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत आत शिरला. परंतु दरवाजा बंद झाल्याने तो आत अडकला. याची माहिती पोलीस पाटील रविंद्र महाडिक यांनी तात्काळ वनविभागाला दिली.
वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बाथरूमचा दरवाजा लाकडी फळ्यांनी बंद करून पिंजरा लावण्यात आला. त्यानंतर बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात घेतले गेले, तर कुत्रालाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी सूर्यकांत बेलुरे (पशुधन विकास अधिकारी, कडवई) यांनी बिबट्याची तपासणी केली. तो नर असून वय अंदाजे ८ ते ९ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. बिबट्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचेही त्यांनी सांगितले. तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या कारवाईदरम्यान परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी न्हानू गावडे, वनरक्षक आकाश कडूकर (फुणगूस), सहयोग कराडे (साखरपा), सुप्रिया काळे (दाभोळे), सुरज तेली (आरवली), शर्वरी कदम (जाकादेवी), तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
ही संपूर्ण मोहीम विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
वनविभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी आवाहन केले की, अशा प्रकारे एखादा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1926 किंवा मो. 9421741335 वर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.