( बारामती )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर दौऱ्यात राज्य आणि केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेतील भ्रष्टाचार, बोगस मतदार यादी, महिलांवरील वाढते अत्याचार, टोलमाफी, महागाई तसेच पंतप्रधानांच्या घोषणा यांसारख्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सरकारला जाब विचारला.
लाडकी बहीण योजनेतील घोटाळा
“लाडकी बहीण योजनेत तब्बल २६ लाख ३४ हजार बोगस फॉर्म भरले गेले. पुण्यासारख्या सक्षम प्रशासन असलेल्या जिल्ह्यात दोन लाख खोटे फॉर्म नोंदवले जाणे म्हणजे भ्रष्टाचार नाही तर काय? हा तब्बल ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. हे पैसे शाळा, रस्ते किंवा कर्जमाफीसाठी वापरले गेले असते तर सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला असता,” असा गंभीर आरोप सुळेंनी केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका करत त्यांनी म्हटलं, “योजना बंद केली म्हणून प्रश्न सुटणार नाहीत. त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.”
बोगस मतदार यादीवर थेट आरोप
बोगस मतदार यादीच्या मुद्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, “या चौकशीची सुरुवात माझ्यापासून करा, बारामती मतदारसंघापासून सुरू करा. भाजपाचे नेतेही डुप्लिकेट मतं असल्याचं मान्य करतात. राहुल गांधी आणि बाळाराम पाटील यांनी याचे ठोस पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे गडबड स्पष्ट आहे.” याच अनुषंगाने सुळे यांनी सरकारला ‘घोटाळेबाज सरकार’ असे संबोधले. “सिडको, अॅम्बुलन्स असे रोज नवे घोटाळे उघड होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांवरूनही त्यांनी सरकारवर प्रहार केला. “केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महिलांवरील अत्याचारांची स्थिती गंभीर आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असूनही महिलांची सुरक्षा धोक्यात आहे,” असा आरोप सुळेंनी केला.
फडणवीस व भोसले यांच्या वक्तव्यांवर प्रत्युत्तर
भाजप नेते तुषार भोसले यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, “लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मी जे योग्य वाटतं तेच बोलते आणि करते. माझा आणि पांडुरंगाचा संबंध लोकांना माहिती आहे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “मत चोरी” वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी म्हटलं, “लोकशाहीत कुणी काही बोललं तर त्याचा राग धरू नये. पण सध्याचं सरकार फक्त घोषणाबाज आहे. २६ लाख बहिणींना फसवणारे हे सरकार टोलमाफीसारख्या घोषणांनी लोकांना खरोखर दिलासा देईल का, हा प्रश्न आहे.”
राज्यात २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणी अपात्र
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकूण २६ लाख ३४ हजार महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत. पुणे, ठाणे, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत गोंधळ निर्माण झाला आहे आणि सरकारी निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता आहे. राज्यात २६ लाख ३४ हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत. यापैकी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात २ लाख ४ हजार महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात १ लाख २५ हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत.
राधाकृष्ण विखे पाटलांच्या अहिल्यानगरात देखील २५ हजार ७५६ लाडक्या बहिणी अपात्र असून त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नाशिकमध्ये १ लाख ८६ हजार ८०० महिला अपात्र ठरल्या आहेत. मंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये १ लाख ४ हजार ५०० बहिणी अपात्र ठरल्या आहेत. नागपुरात ९५ हजार ५०० अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतलेला आहे. बीड जिल्ह्यात देखील ७१ हजार तर सोलापूरात १ लाख ४ हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. साता-यात ८६ हजार, अमरावती मध्ये ६१ हजार अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला आहे.
योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी सुरू आहे. ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचा लाभ बंद केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रविवारी नागपूर येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये सुमारे २६ लाख महिलांनी या योजनेचा गैरवापर केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात सरकारकडून चौकशी सुरू आहे. जे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे.

