(नाशिक)
“माझ्याकडे पक्षातील कुठलेही पद नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मला निवृत्त केलं आहे. मात्र, मला जनतेसाठी काम करायचं आहे, आणि त्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे मी भाजपात प्रवेश करणार आहे,” असे स्पष्ट शब्दांत मत माजी मंत्री बबनराव घोलप यांनी व्यक्त केले. उद्या (१८ जून) ते अधिकृतरित्या भाजपात प्रवेश करणार असून, त्यांच्यासोबत सुधाकर बडगुजर आणि अन्य अनेक पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश अपेक्षित आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा होणार आहे.
बबनराव घोलप हे विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. परिणामी महापालिकेची निवडणूक होणार असल्याने याबाबत सुद्धा त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. त्यामुळे ते स्वतः व त्यांचे पुत्र योगेश घोलप हे सुद्धा गेल्या काही दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नव्हते.
शिर्डी मतदारसंघातून डावलल्याने नाराजी
बबनराव घोलप हे पूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. मात्र, काही काळातच त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या चिरंजीव माजी आमदार योगेश घोलप यांना देवळाली मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी तीव्र मेहनत घेतली, तरी योगेश यांचा पराभव झाला. “पक्षात मला आता कुठलंच स्थान नाही, विश्वासात घेतलं जात नाही,” असे सांगून त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात इनिंग
नाशिकरोड भागातील माजी नगरसेवक अशोक सातभाई हेही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून भाजपात प्रवेश करणार आहेत. सातभाई यांचा पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सक्रिय सहभाग होता.
सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश वादाच्या भोवऱ्यात
शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित असून, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते देखील त्यांच्यासोबत भाजपात दाखल होणार आहेत. मात्र, बडगुजर यांच्या प्रवेशावर भाजप आमदार सीमा हिरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
“बडगुजर यांच्यावर २९ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची प्रतिमा व संघटनात्मक ताकद धोक्यात येईल. जर त्यांना पक्षात घ्यायचंच असेल, तर ते इतर तालुक्यांमध्ये घ्या — नाशिकमध्ये नको,” असा स्पष्ट विरोध आमदार हिरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पुराव्यांसह मांडल्याचे सांगितले.
“संघटन वाढवायचंय, काही निर्णय कठीण असतात”
भाजपाचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी बडगुजर यांच्यासह अन्य नेत्यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. काही नेते भाजपात येण्यास इच्छुक आहेत. जर आम्ही त्यांना घेतलं नाही, तर ते इतर पक्षात जातील. आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही ‘100 प्लस’ चा नारा दिला आहे. त्यामुळे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काही कठीण निर्णय घ्यावेच लागतात.”