(छत्रपती संभाजीनगर)
कचरा म्हणजे समस्या, पण ई-कचरा म्हणजे सुवर्णसंधी! हे सिद्ध करून दाखवलं ते छत्रपती संभाजीनगरच्या मराठमोळ्या संशोधिका डॉ. पूजा सोनवणे यांनी. ई-कचरा व्यवस्थापनावर केलेल्या त्यांच्या संशोधनाला देवभूमी उत्तराखंड विद्यापीठात १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या ६६ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट संशोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘एएमआय स्प्रिंगर नेचर’कडून ३०० युरो मूल्याचे स्प्रिंगर व्हाउचर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
भारत जगातील तिसरा सर्वाधिक ई-कचरा निर्माण करणारा देश
अमेरिका व चीननंतर भारत ई-कचरा निर्माण करण्यात तिसऱ्या स्थानावर आहे. येत्या काही वर्षांत ही समस्या अधिक तीव्र स्वरूप धारण करणार असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉ. सोनवणे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘बायोलीचिंग’—ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वदेशी शक्तिशाली उपाय
आपल्या सादरीकरणात डॉ. सोनवणे यांनी सिद्ध केले की टाकून दिलेल्या मोबाइल, लॅपटॉप्स, टीव्ही, सर्व्हर, सर्किट बोर्ड्स यांसारख्या ई-कचर्यात तांबे, निकेल, झिंक, टीन, अॅल्युमिनियम यांसारखे सामान्य धातूच नव्हे तर सोने, चांदी, पॅलेडियम, प्लॅटिनम यांसारखे मौल्यवान धातू प्रचंड प्रमाणात दडलेले आहेत.
‘बायोलीचिंग’ प्रक्रियेद्वारे हे धातू कमी खर्चात, पर्यावरणपूरक पद्धतीने आणि अत्यंत कार्यक्षमतेने पुनर्प्राप्त करता येतात.
या प्रक्रियेत विशिष्ट सूक्ष्मजंतूंमार्फत ई-कचर्यातील धातू वेगळे काढले जातात. सूक्ष्मजंतूंनी तयार होणाऱ्या आम्लयुक्त व ऑक्सिडायझिंग संयुगांमुळे खनिजांचे विघटन होते आणि धातू मुक्त होतात.
१ टन ई-कचर्यात किती ‘खजिना’?
डॉ. सोनवणे यांच्या संशोधनानुसार, १ टन सर्किट बोर्ड्स किंवा सर्व्हर कचर्यातून मिळू शकतात—
- १५०–२०० ग्रॅम सोने
- ८००–१००० ग्रॅम चांदी
- १५०–२०० किलो तांबे
- पॅलेडियमचे मौल्यवान अंश
डॉ. सोनवणे म्हणतात, “ई-कचरा ही फक्त पर्यावरणाची समस्या नाही; ती एक मोठी आर्थिक क्रांती घडवणारी संधी आहे. हायब्रीड तंत्रज्ञान आणि कठोर धोरणे लागू केली तर भारत लवकरच या क्षेत्रात जागतिक ‘लीडर’ बनू शकेल.” त्यांच्या या संशोधनामुळे भारतातील ई-कचरा व्यवस्थापनासाठी एक नवी दिशा आणि आर्थिक शक्यता खुल्या होणार आहेत.

