( नवी दिल्ली )
नोकरदार कर्मचाऱ्यांच्या पगारातून नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधी (PF) कापला जातो. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) यामार्फत कर्मचाऱ्यांची पीएफ खाती उघडली जातात. त्यात कर्मचारी आणि नियोक्ता दोघांकडून निश्चित रक्कम जमा केली जाते. यावर वार्षिक व्याजही मिळते. याच दरम्यान, EPFO कडून कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ‘मृत्यू मदत कोष’ (Ex-Gratia Assistance) अंतर्गत दिली जाणारी मदत ८.८ लाख रुपयांवरून वाढवून आता १५ लाख रुपये करण्यात आली आहे. ही सुधारित योजना १ एप्रिल २०२५पासून लागू झाली आहे.
कोणाला मिळणार मदतीची रक्कम?
ही रक्कम सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नॉमिनी, कायदेशीर वारस किंवा कुटुंबियांना दिली जाणार आहे. म्हणजेच नोकरी करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार म्हणून EPFO कडून थेट १५ लाख रुपये मिळतील.
कोठून येणार पैसा?
या निधीची तरतूद सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या ‘स्टाफ वेल्फेअर फंडा’तून केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, १ एप्रिल २०२६ पासून या रकमेत दरवर्षी ५% वाढ केली जाईल.
निर्णयामागचं कारण
हा निर्णय घेताना सरकार, नियोक्ते आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन, घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्री गमावलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी यासाठी EPFO ने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

