( नवी दिल्ली )
वीर बालदिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी देशातील 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात महिला व बालविकास मंत्रालयातर्फे आयोजित समारंभात शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला व संस्कृती तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा सन्मान देण्यात आला.

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील 17 वर्षीय अर्णव महर्षी याला विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले. लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांच्या पुनर्वसनासाठी अर्णवने एआय आधारित उपकरण आणि अॅक्टिव्ह हँड रिस्ट बँड विकसित केला आहे. स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने कार्य करणारे हे उपकरण नवोन्मेषी आणि किफायतशीर असल्याचे सांगितले जाते.
या वर्षीच्या पुरस्कारार्थींमध्ये देशभरातील 9 मुले आणि 11 मुलींचा समावेश आहे. यापैकी दोघांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, ही बालके भारताच्या अमृत पिढीचे खरे प्रतिनिधी आहेत. विविध सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक आव्हानांवर मात करून त्यांनी शौर्य, नवाचार, विज्ञान, क्रीडा, कला आणि समाजसेवा या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या मुलांचे संकल्प आणि प्रयत्न 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुरस्कार विजेत्यांतील काही उल्लेखनीय उदाहरणे:
सात वर्षांची वाका लक्ष्मी प्रग्निकामुळे भारताची बुद्धिबळ क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम झाली आहे. अजय राज आणि मोहम्मद सिदान पी यांनी आपल्या शौर्याने इतरांचे प्राण वाचवले. नऊ वर्षांची व्योमा प्रिया आणि 11 वर्षांचा कमलेश कुमार यांनी इतरांचे प्राण वाचवताना स्वतःचे प्राण गमावले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान दहा वर्षांचा श्रवण सिंग सीमेजवळील जवानांना नियमित पाणी, दूध आणि लस्सी देत असे. शिवानी होसुरू उप्पारा या दिव्यांग मुलीने क्रीडा क्षेत्रात असाधारण कामगिरी केली, तर वैभव सूर्यवंशीने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 – विजेत्यांची यादी:
- व्योमा प्रिया – शौर्य – तमिळनाडू (मरणोत्तर)
- कमलेश कुमार – शौर्य – बिहार (मरणोत्तर)
- मोहम्मद सिदान पी – शौर्य – केरळ
- अजय राज – शौर्य – उत्तर प्रदेश
- एस्थर लालदुहोमि – कला व संस्कृती – मिझोरम
- सुमन सरकार – कला व संस्कृती – पश्चिम बंगाल
- पूजा – पर्यावरण – उत्तर प्रदेश
- शवन सिंह – समाजसेवा – पंजाब
- वंश तायल – समाजसेवा – चंदीगड
- आइशी प्रिशा – विज्ञान व तंत्रज्ञान – आसाम
- अर्णव महर्षी – विज्ञान व तंत्रज्ञान – महाराष्ट्र
- शिवानी उपारा – क्रीडा – आंध्र प्रदेश
- वैभव सूर्यवंशी – क्रीडा – बिहार
- योगिता मंडावी – क्रीडा – छत्तीसगड
- लक्ष्मी प्रगयिका – क्रीडा – गुजरात
- ज्योति – क्रीडा – हरियाणा
- अनुष्का कुमारी – क्रीडा – झारखंड
- धिनिधि देसिंगु – क्रीडा – कर्नाटक
- ज्योषणा सबर – क्रीडा – ओडिशा
- विश्वनाथ कार्तिके – क्रीडा – तेलंगणा

