(नवी दिल्ली)
सौदी अरेबियातील मुफरिहा परिसरात आज (सोमवारी) पहाटे भीषण अपघात घडला असून, उमराह यात्रेसाठी गेलेल्या ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व मृतक तेलंगणा आणि हैदराबाद येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही दुर्घटना IST वेळेनुसार सुमारे १.३० वाजता घडली. मक्का येथून मदिनेकडे जात असताना भारतीय यात्रेकरूंनी भरलेली बस डिझेल टँकरला जोरात धडकली, ज्यामुळे बसला भीषण आग लागली. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते.
अपघातात महिला व लहान मुलांसह सुमारे ४२ भारतीय नागरिकांनी गमावल्याची माहिती आहे. बचाव पथके व आपत्कालीन सेवा दलांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना बाहेर काढण्याचे आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने तातडीने उमराह यात्रेकरूंसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत:
8002440003 (Toll Free)
0122614093
0126614276
0556122301 (WhatsApp)
दरवर्षी हजारो भारतीय उमराह आणि हजसाठी मक्का–मदिना मार्गे प्रवास करतात. त्यामुळे या दुर्घटनेमुळे भारतात आणि सौदीत मोठी खळबळ उडाली आहे.
एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या घटनेबाबत तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. “हैदराबादमधील दोन ट्रॅव्हल एजन्सीजच्या यात्रेकरूंचा समावेश होता. बसला भीषण आग लागली असून एक वगळता इतर सर्व जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळत आहे. मी रियाधमधील भारतीय दूतावासाशी संवाद साधला असून परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित हस्तक्षेप करावा. मृतदेह भारतात आणावेत आणि जखमींना तातडीने उपचार मिळावेत,” अशी मागणी ओवैसी यांनी केली.
तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा शोक, तातडीची कारवाई
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना घटनेचा सविस्तर अहवाल मागवण्याचे निर्देश दिले आहेत. ते MEA आणि रियाधमधील भारतीय दूतावासाशी संपर्कात असून, मृतांच्या कुटुंबांना मदत आणि जखमींसाठी सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सौदी सरकारनेही जखमी यात्रेकरूंना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

