(मुंबई)
कोकणातून मुंबई, पुण्यासह इतर शहरांत स्थायिक झालेल्या नागरिकांना यापुढे ‘चाकरमानी’ न म्हणता ‘कोकणवासीय’ या आदरयुक्त संबोधनाने उल्लेख करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. या निर्णयामुळे कोकणवासीयांच्या स्वाभिमानास हातभार लागेल, असे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे. लवकरच यासंदर्भात शासन परिपत्रक जारी होणार आहे.
कोकणवासीयांच्या संघटनांचा ठाम आग्रह
मुंबई-गोवा महामार्गाच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे, तसेच कोकणातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत काही संघटनांनी “चाकरमानी” हा शब्द अपमानकारक आणि औपचारिकतेला साजेसा नसल्याची ठाम भूमिका मांडली. शासनाच्या कागदपत्रांत आणि अधिकृत कामकाजात या शब्दाचा वापर टाळून, त्याऐवजी ‘कोकणवासीय’ असा उल्लेख करावा, अशी मागणी केली.
सांस्कृतिक नाळ जपणाऱ्या लोकांचा गौरव
गेल्या अनेक दशकांपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील हजारो कुटुंबं नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांत स्थायिक झाली आहेत. मात्र आजही त्यांनी कोकणाशी आपली नाळ जोडून ठेवलेली आहे. गणेशोत्सव, शिमगा, दिवाळी यांसारख्या सणांसाठी ही मंडळी आजही आपल्या मूळगावी परततात, कोकणात सण साजरे करतात, आपल्या मुळाशी नातं टिकवून ठेवतात. तथापि, ‘चाकरमानी’ हा शब्द काळाच्या ओघात एकप्रकारे उपेक्षेने वापरला जाऊ लागल्याचा अनुभव अनेक कोकणवासीयांनी व्यक्त केला होता. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाने त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्याचे निश्चित केले आहे.
गणेशोत्सवापूर्वी शासन निर्णयाची शक्यता
उपमुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, येत्या गणेशोत्सवापूर्वी शासन निर्णय प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव ‘कोकणवासीय’ या गौरवाने साजरा होणार, अशी अपेक्षा आहे.

