(संगमेश्वर / प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत उपकेंद्र कोसुंब यांच्या वतीने दादासाहेब सरफरे विद्यालयात ‘लिंग आधारित हिंसाचार : प्रतिबंध व कायदेशीर संरक्षण’ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच सुरक्षित, सुदृढ आणि हिंसामुक्त समाज घडविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
उपकेंद्र कोसुंब येथे एप्रिल २०२६ पासून या अभियानाअंतर्गत विविध आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. अभियानाच्या प्रारंभी कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, आरोग्य जनजागृती, तंबाखूविरोधी अभियान, जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती, पावसाळी आजारांचे प्रतिबंध, किशोरी मुलींची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन, कॅन्सर तपासणी शिबिर, एनसीडी (मधुमेह व उच्च रक्तदाब) तपासणी, गावातील कचरा व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांवर समितीच्या बैठकीत चर्चा करून त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित व्याख्यानात ॲड. पुनम जाधव आणि ॲड. शोभा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना किशोरावस्था, मुला-मुलींमधील परस्पर संबंध, लिंग आधारित हिंसाचाराचे विविध प्रकार, त्यावरील कायदेशीर संरक्षण तसेच सुरक्षित आणि जबाबदार वर्तन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी ऋतुजा अजय शिंदे यांनी किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, त्यांचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार आणि आरोग्य शिक्षणाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाला निर्मल ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश जाधव, शिवणे ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती पवार, उपकेंद्र कोसुंबचे सर्व आरोग्य कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे स्वागत करत समाजात आरोग्यदायी, सुरक्षित आणि हिंसामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

