(मुंबई)
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज (२२ जून) पासून सुरू होत असून ते १० जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला तथ्यांच्या आधारे उत्तर देण्यास सरकार पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी सरकारविरोधात दिलेल्या पत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी, “आधी एका पानावर सह्या घेतल्या आणि नंतर त्याला पत्र जोडले. विरोधकांना जनतेच्या खऱ्या प्रश्नांची जाण नसल्यामुळे त्यांचे आरोप वस्तुस्थितीपासून दूर आहेत,” असे म्हटले.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या पारंपरिक चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकरी, मान्सूनची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक, कायदा-सुव्यवस्था आणि राज्यातील विकासकामे या जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर अधिवेशनात सविस्तर चर्चा होणार आहे. लोकप्रतिनिधींनी जनहिताचे प्रश्न मांडावेत आणि विधायक चर्चेतून त्यावर तोडगा काढावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षांनी सरकारच्या पारंपरिक चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधकांना त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अधिवेशन हे केवळ आरोप-प्रत्यारोपांचे व्यासपीठ नसून जनतेच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्याचे माध्यम आहे. सरकार प्रत्येक मुद्द्यावर वस्तुनिष्ठ आणि तथ्याधारित उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाची विधेयके आणि धोरणात्मक निर्णय या अधिवेशनात मांडले जाणार आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवणे, उद्योगांना चालना देणे आणि विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
’56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी हा ऐतिहासिक निर्णय’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सरकारसमोर कोणतीही निवडणूक नसतानाही केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. “कर्जमाफी हा राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीचा तात्पुरता उपाय आहे. राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून, यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी कधीच झाली नव्हती,” असे त्यांनी सांगितले.
‘100 मिमी पाऊस होईपर्यंत पेरणी करू नका’
राज्यात यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा सुमारे 80 टक्के कमी पाऊस झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. “23 जूनपासून कोकणात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’
लाडकी बहीण योजनेतून 81 लाख महिलांची नावे वगळल्याच्या आरोपांवर मुख्यमंत्री म्हणाले, “वारंवार संधी देऊनही केवायसी पूर्ण न करणाऱ्या किंवा योजनेच्या पात्रतेत न बसणाऱ्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र पात्र असलेल्या प्रत्येक महिलेला दरमहा 1,500 रुपयांचा लाभ मिळत आहे. लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि पुढेही सुरूच राहणार आहे.”
एकनाथ शिंदे : ’36 हजार कोटींची कर्जमाफी, शेतकरी प्रथम’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या बहिष्कारावर टीका करत सरकार शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे असल्याचे सांगितले. “36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली जात आहे. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे ते म्हणाले.
शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीचाही आढावा घेतला. “सरकारने आतापर्यंत 300 हून अधिक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र, सर्वसामान्यांसाठी घरे, ग्रामीण भागातील साडेतीन हजार किलोमीटर रस्ते आणि विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या काळात विकासाला ब्रेक होता, तर आमच्या सरकारचा पाय एक्सलेटरवर आहे,” असा दावा त्यांनी केला. राजकीय चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, “लवकरच तुम्हाला मोठी बातमी मिळेल. मी जे ऑपरेशन करतो, ते फुलप्रूफ करतो.”
राज ठाकरेंवर फडणवीसांचा टोला
राज ठाकरे यांच्या अलीकडील राजकीय वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे यांच्याबद्दल एक मीम पाहिले. त्यात ते म्हणतात, ‘मला छान झोप लागते, माझ्यासोबत एकही आमदार किंवा खासदार नाही.’ त्यावर आता अधिक काही बोलण्याची गरज नाही,” असे म्हणत त्यांनी मिश्कील टोला लगावला.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. अतिवृष्टी, पूरस्थिती आणि इतर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात विविध विधेयके, जनहिताचे प्रश्न आणि विकासाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

