(ठाणे )
ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट कागदपत्रांच्या आधारे विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 1 कोटी 65 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात सुमारे 1 कोटी 40 लाख रुपये किमतीचे बनावट विदेशी मद्य आहे.
कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील आर. सी. पाटील टोल नाका ते माजिवाडा रोडदरम्यान संशयास्पद कंटेनरमधून विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचत ५ मे २०२६ रोजी कंटेनर अडवला. ही कारवाई विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक एम. पी. धनशेठी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, एस. आर. मिसाळ आणि सहाय्यक निरीक्षक व्ही. जी. शिरसाट यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
12,728 लिटर विदेशी मद्य जप्त
कंटेनरची तपासणी केली असता पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये 180 मिली क्षमतेच्या व्हिस्कीच्या बाटल्या आढळल्या. या सर्व बाटल्या गोवा राज्यात निर्मित असल्याचे स्पष्ट झाले. एकूण 1,450 बॉक्समधील सुमारे 12,728 बल्क लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात आरोपी बनावट इनव्हॉइस तयार करून औषधांच्या नावाखाली मद्याची वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे तपास यंत्रणांना चकवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात वाहनचालक परत सिंग कतार सिंग आणि अमृतबीर सिंग हरप्रीत सिंग यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून या रॅकेटमागील मोठ्या साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बेकायदेशीर मद्य तस्करीविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

