(भिवंडी / ठाणे)
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गुरुवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. बालाजी नगर, गंगारामवाडी परिसरातील चार मजली कोहिनूर अपार्टमेंट अचानक कोसळल्याने किमान 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून NDRF, TDRF, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 14 वर्षे जुनी असलेली ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. महापालिकेने यापूर्वीच इमारतीला धोकादायक असल्याची नोटीस बजावली होती. दरम्यान, इमारतीच्या पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यरात्री पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत
ही दुर्घटना गुरुवारी (30 जुलै) रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. इमारत काही क्षणांतच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
मात्र, दुर्घटनास्थळी जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने सुरुवातीला बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. त्यानंतर रात्री उशिरा NDRF आणि TDRF पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य सुलभ करण्यासाठी इमारतीसमोरील जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. त्यानंतर बचाव पथकांना ढिगाऱ्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले.
कुटुंबाची थरारक सुटका; मुलीने स्वतःचा जीव वाचवला
दुर्घटनेवेळी इमारतीत अनेक कुटुंबे झोपेत होती. रहिवासी अरविंद गुप्ता आणि त्यांची पत्नी इमारत कोसळत असताना बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र त्यांची मुलगी कोमल गुप्ता ढिगाऱ्याखाली अडकली होती. प्रसंगावधान राखत तिने स्वतःची सुटका करून घेत जीव वाचवल्याची माहिती समोर आली आहे. तिने इमारतीच्या पिलरची दुरुस्ती सुरू असतानाच दुर्घटना घडल्याचे सांगितले.
स्थानिक नागरिकांची मोठी मदत
दुर्घटनेनंतर परिसरातील स्थानिक तरुणांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत अनेक रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही जणांची सुटकाही करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

