(रायगड)
नऊ महिन्यांच्या गर्भवती सख्या भावजयचा कुऱ्हाडीने निर्घृण खून करून गेली 24 वर्षे फरारी असलेल्या आरोपी दिरास नेरळ पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. संतोष गणपत राणे असे या आरोपीचे नाव असून, तो पळ काढल्यानंतर नाव बदलून ‘संतोष गणपत पाटील’ म्हणून पिंपरी चिंचवड परिसरात केटरिंगचा व्यवसाय करीत होता. नेरळचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त सुत्रे आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही घटना कर्जत तालुक्यातील कळंब पोहोई गावात 2 फेब्रुवारी 2001 रोजी घडली होती. दुपारी तीनच्या सुमारास वीटभट्टीवर काम करून फिर्यादी अनिल गणपत राणे घरी परतले असता, त्यांची नऊ महिन्यांची गर्भवती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यावेळी कौटुंबिक कारणावरून आरोपी संतोष याचा भावजयसोबत वाद झाला होता. संतापाच्या भरात त्याने घरातील कुऱ्हाड उचलून मानेवर, डोक्यावर, हातावर आणि दंडावर सलग घाव करून तिचा जागीच खून केला. मृत महिला गर्भवती असल्याने हा दुहेरी खून मानला गेला. गुन्ह्यानंतर आरोपी गावातून फरार झाला होता.
गेल्या दोन दशकांत अनेक अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेतला; मात्र तो सतत नाव, राहते ठिकाण आणि रोजगार बदलत असल्याने शोध चुकत होता. याप्रकरणी नव्याने तपास हातात घेतल्यानंतर PSI शिवाजी ढवळे यांनी रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल आणि कर्जत उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार केले. PSI भास्कर गच्चे, पोलिस शिपाई राजेश केकाण आणि आशू बेंद्रे यांनी सातत्याने तपास सुरू ठेवला.
दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पिंपरी चिंचवड, सांगवी परिसरात येत असल्याचे समोर आले. तांत्रिक पुरावे तपासून पथकाने सांगवीतील फेमस चौक भागात सापळा रचला. येथे आरोपी ‘संतोष पाटील’ या नावाने केटरिंगचे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अचूक कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली असून सध्या त्याचे वय 49 वर्षे आहे. 24 वर्षांच्या फरारीनंतर त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे.
या उल्लेखनीय तपासामुळे नेरळ पोलिसांनी पुन्हा एकदा आपली दक्षता, सातत्य आणि तपासक्षमता सिद्ध केली आहे. पुढील तपास PSI नितीन मंडलिक करीत आहेत.

