(रत्नागिरी)
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापनात विलिनीकरण करण्याच्या प्रक्रियेला आता महाराष्ट्र सरकारची लेखी संमती मिळाल्याने मोठी चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत पत्र पाठवले असून, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकारने कोकण रेल्वेच्या विलिनीकरणास औपचारिक मंजुरी दिली आहे.
कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रबळ होत होती. यासाठी कोंकण विकास समिती, तसेच विविध रेल्वे कर्मचारी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विशेषतः रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय महापदी यांनी कोकण रेल्वेच्या स्थापनेपासून ते आजवरचा आर्थिक प्रवास, उत्पन्न, घेतलेले कर्ज आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली होती.
या मुद्द्याला राजकीय पातळीवरही मोठा पाठिंबा मिळाला. आमदार प्रवीण दरेकर, तसेच शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, खासदार नरेश म्हस्के, रविंद्र वायकर, नारायण राणे व अरविंद सावंत यांनीही संसद आणि अन्य व्यासपीठांवर कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाचा मुद्दा ठामपणे मांडला होता.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लेखी पत्रामुळे आता केंद्र सरकारच्या रेल्वे बोर्डपुढे विलिनीकरणाच्या प्रक्रियेला अधिकृत रूप देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे कोकण रेल्वेला आर्थिकदृष्ट्या अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे, तसेच कर्मचारी हितसुद्धा सुरक्षित होणार असल्याचे बोलले जात आहे.