(नवी दिल्ली)
2020 मध्ये भारत सरकारकडून बंदी घालण्यात आलेलं चिनी व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक (TikTok) पुन्हा एकदा भारतात परतणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही भारतीय यूजर्सना टिकटॉकची वेबसाइट ॲक्सेस करता आल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, अद्यापही गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवर टिकटॉक उपलब्ध नाही, आणि भारत सरकारकडूनही कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
टिकटॉक परतणार? अधिकृत माहिती नाही
टिकटॉकच्या पुनरागमनाविषयी भारत सरकार किंवा बाईटडान्स (टिकटॉकची मूळ कंपनी) यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, काही युजर्सनी ट्विटर (एक्स) आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, ते टिकटॉकची वेबसाइट भारतातून सहजपणे ॲक्सेस करू शकले. त्यामुळे कंपनी टप्प्याटप्प्याने भारतात पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
2020 मध्ये टिकटॉकवर बंदी
जून 2020 मध्ये, भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचं सांगत टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. यामध्ये शेअरइट, एमआय व्हिडिओ कॉल, कॅम स्कॅनर, क्लब फॅक्टरी अशा लोकप्रिय अॅप्सचाही समावेश होता. बंदी लागू होण्यापूर्वी टिकटॉकचे भारतात अंदाजे २० कोटी युजर्स होते, आणि हे प्लॅटफॉर्म भारतीय बाजारासाठी अत्यंत फायदेशीर ठरत होते. त्यामुळे ही बंदी टिकटॉकसाठी मोठा धक्का होती.
सोशल मीडियावर चर्चा रंगली
टिकटॉक पुन्हा भारतात परतत असल्याच्या शक्यतेमुळे युजर्समध्ये उत्सुकता आणि चर्चा वाढली आहे. काहींनी याचे स्वागत केले असले, तरी काही युजर्सनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली आहे. कंपनीकडून भारतासाठी स्वतंत्र धोरण किंवा सर्व्हर तयार केला जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

