(बुलडाणा)
प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलताना त्यांनी म्हटले, “आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका.” त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
बच्चू कडू म्हणाले, “शेतकरी आत्महत्या करतो, पण तुम्ही विचारांची लढाई सोडून जातीपातीची लढाई सुरू केली म्हणून शेतकरी मागे राहिला. शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत असेल, तर त्यांनी बांगड्या भराव्यात. शहरातील आमदार परवडतात, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातील आमदारांचे मस्त असते — हप्ते वसूल केले की झाले. तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, किमान त्याला लाथ तरी मारता येते.” सरकारवर टीका करताना ते म्हणाले, “सरकार हे डुकरासारखे आहे; डुक्कर परवडेल पण सरकार नाही.” या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.
पुढे ते म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपवली. शेतकरी नेते शरद जोशी अडीच लाख रुपयांची नोकरी सोडून तुमच्यासाठी लढले, पण त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. राजू शेट्टी, मला, शरद जोशींना जातीच्या राजकारणामुळे पाडण्यात आले. बाबासाहेबांसारख्या विद्वान व्यक्तीलाही जातीमुळे हरवण्यात आले, हीच आपल्या व्यवस्थेची शोकांतिका आहे.”
काही दिवसांपूर्वी बच्चू कडू नागपूर येथे सरकारविरोधात आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारच्या शिष्टमंडळाने समजूत काढल्यानंतर त्यांनी ते आंदोलन मागे घेतले होते. मात्र, आता ते पुन्हा आक्रमक भूमिकेत दिसत असून त्यांच्या “आमदाराला कापा” या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

