(पुणे)
गांजा तस्करांशी थेट संगनमत करून अवैध धंद्यांना पोलीस संरक्षण दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यातील अंमलदार नवनाथ शिंदे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. परिमंडळ दोनचे उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी हा आदेश दिल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना काही दिवसांपूर्वी सहकारनगर परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाच्या तस्करीसह अन्य अवैध धंद्यांची माहिती मिळाली होती. यावरून गुन्हे शाखा युनिट पाचचे निरीक्षक संजय पतंगे यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत प्रतिक पवार या युवकाला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ५ किलो २६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान प्रतिक पवारकडून माहिती मिळाली की, हा गांजा सौरभ कट्टीमणी उर्फ पाटील, सागर चव्हाण उर्फ डोंगाभाई आणि मॅनेजर अभिजित सावंत यांच्या मार्फत पुरवठा केला जात आहे. तसेच पवार आणि त्याचा साथीदार संदीप घोटे यांना गांज्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचेही समोर आले. या सर्वांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईल तपासातून पोलीस अंमलदार शिंदेंचा संदिग्ध संबंध तपासात प्रतिक पवारच्या मोबाइलमध्ये एक महत्त्वाचा धागा सापडला. त्यात पोलीस अंमलदार नवनाथ शिंदेंचा क्रमांक ‘एन बी’ या नावाने सेव्ह असल्याचे आढळले. चौकशीमध्ये पवारने सांगितले की, शिंदे सहकारनगर परिसरात वसुलीचे काम पाहतात आणि स्पा, पिटा, मटका क्लबसारख्या अवैध धंद्यांना थेट पाठबळ देतात. या गंभीर आरोपांमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

