(वसई)
भाईंदर खाडीवरून पश्चिम उपनगरीय लोकल रेल्वे सेवा धावते. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र, धावत्या गाड्यांतून निर्माल्य व इतर वस्तू खाडीत फेकण्याच्या प्रकारांमुळे गंभीर अपघात घडत आहेत. अशाच एका घटनेत, लोकलमधून फेकलेला नारळ लागून नायगावमधील संजय दत्ताराम भोईर (30) यांचा मृत्यू झाला.
संजय भोईर हे नायगाव व भाईंदर खाडी दरम्यानच्या पाणजू बेटावर राहत होते. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते नायगाव-भाईंदर रेल्वे खाडी पुलावरून पायी नायगाव स्थानकाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी धावत्या लोकलमधून खाडीत फेकलेला नारळ थेट त्यांच्या डोक्याला लागला. गंभीर जखमी झालेल्या संजय यांना प्रथम वसईतील सर डीएम पेटिट रुग्णालयात व नंतर मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला जबर मार लागल्याने व रक्तस्त्राव झाल्याने रविवारी (28 सप्टेंबर) सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर पाणजू गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. धावत्या लोकलमधून प्रवासी निर्माल्याच्या पिशव्या, नारळ, अगदी जुन्या मूर्ती देखील खाडीत भिरकावतात. अनेकदा हे थेट पुलावरून पायी जाणाऱ्या प्रवाशांवर आदळते आणि त्यात जखमी होतात. म्हणूनच, धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकणाऱ्यांवर बंदी आणावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

