(नवी दिल्ली)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील ‘सेवा तीर्थ’ या अत्याधुनिक पंतप्रधान कार्यालय संकुलाचे तसेच कर्तव्य भवन १ आणि २ चे उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर पंतप्रधान कार्यालयाचा अधिकृत पत्ता आता बदलला असून, रायसीना हिलवरील साउथ ब्लॉक येथे असलेले पीएमओ आता सेवा तीर्थ संकुलात कार्यरत होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाचे नाव हे “सेवा तीर्थ” असणार आहे. तर “कर्तव्य भवन-१” आणि “कर्तव्य भवन-२” मध्ये अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांची कार्यालये असतील.
उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक या इमारती ब्रिटिश राजवटीचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले. गुलामगिरीच्या भारताच्या भूमीवर ब्रिटिश साम्राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी या इमारती माध्यम म्हणून उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पीएमओचा ७८ वर्षांचा इतिहास, नव्या पर्वाची सुरुवात
पंतप्रधान कार्यालय १९४७ पासून साउथ ब्लॉकमध्ये कार्यरत होते. जवळपास ७८ वर्षे ही इमारत देशातील सत्तेचे केंद्र राहिली. मात्र २०१४ नंतर केंद्र सरकारने ब्रिटिश राजवटीच्या प्रतिकांपासून दूर जाण्यासाठी सातत्याने पावले उचलली. दिल्लीतील अनेक इमारती आणि ऐतिहासिक स्थळे गुलामगिरीच्या खुणांनी भरलेली असल्याचे नमूद करत, स्वतंत्र भारतात शहीद सैनिकांचे राष्ट्रीय स्मारक नव्हते, ही खंतही पंतप्रधानांनी व्यक्त केली. २०१४ मध्ये भारताने गुलामगिरीची मानसिकता आता सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट निर्णय घेतला. या निर्णयांमागे केवळ सत्तेचा बदल नव्हे, तर सेवाभावी भावना असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘सेवा तीर्थ’ संकुल: प्रशासनाचे नवे केंद्र
पंतप्रधानांनी आज सकाळी सेवा तीर्थ संकुलाचे औपचारिक उद्घाटन केले. या संकुलात आता पंतप्रधान कार्यालय (PMO), राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) आणि कॅबिनेट सचिवालय कार्यरत राहणार आहे. आजपासून पीएमओ अधिकृतपणे रायसीना हिलवरील साउथ ब्लॉकमधून सेवा तीर्थ येथे स्थलांतरित झाल्याची माहिती देण्यात आली.
उद्घाटनावेळी सेवा तीर्थला समर्पित फलकाचे अनावरण करण्यात आले. संकुलाच्या भिंतीवर देवनागरी लिपीत ‘सेवा तीर्थ’ असा शिलालेख कोरलेला असून, त्याखाली ‘नागरिक देवो भव’ हा मंत्र कोरण्यात आला आहे. हा मंत्र प्रशासन आणि नागरिक यांच्यातील नात्याचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
‘लखपती दीदी’ योजनेला मोठी चालना
सेवा तीर्थवरून बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ग्रामीण आणि आर्थिक सशक्तीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. पीएम राहत योजनेअंतर्गत ‘लखपती दीदी’ योजनेचे उद्दिष्ट दुप्पट करून आता ६ कोटी महिलांपर्यंत नेण्यात आले आहे. यासोबतच कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून २ लाख कोटी रुपये करण्यात आला आहे. तसेच १० हजार कोटी रुपयांच्या निधीसह ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स २.०’ सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयांमुळे महिला उद्योजकता, कृषी क्षेत्र आणि नवउद्योगांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
नव्या भारताचे प्रतीक
सेवा तीर्थ संकुल हे केवळ प्रशासकीय बदलाचे प्रतीक नसून, गुलामगिरीच्या वारशातून बाहेर पडून सेवाभाव, कर्तव्य आणि नागरिक-केंद्रित प्रशासन या मूल्यांवर आधारित नव्या भारताचे प्रतीक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. दिल्लीच्या सत्ताकेंद्राच्या इतिहासात आजचा दिवस एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
“सेवा तीर्थ” बांधकाम निर्मितीला ₹१,१८९ कोटींचा खर्च
पंतप्रधान कार्यालय आता सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नव्याने बांधलेल्या संकुल “सेवा तीर्थ” मध्ये स्थलांतरित होईल. अंदाजे ₹१,१८९ कोटी खर्चून विकसित केलेले हे संकुल २२६,२०३ चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले आहे. हे बांधकाम आघाडीच्या पायाभूत सुविधा कंपनी लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) ने केले आहे.
आधुनिक सोई सुविधांनी परिपूर्ण
विजय चौकाजवळ असलेले हे नवीन कार्यालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. मंत्रिमंडळाच्या बैठका सामान्यतः पंतप्रधानांच्या निवासस्थानी (७ लोक कल्याण मार्ग) घेतल्या जात असल्या तरी, नवीन ‘सेवा तीर्थ’ संकुलात एक कॅबिनेट हॉल विशेषतः डिझाइन करण्यात आला आहे. संसद भवनाच्या अगदी जवळ असलेल्या या संकुलाजवळ एक नवीन पंतप्रधान निवासस्थान देखील बांधले जात आहे. या संपूर्ण स्थलांतराचा एक प्रमुख उद्देश पंतप्रधानांच्या हालचाली सुलभ करणे आणि त्यांच्या प्रवासादरम्यान जनतेला येणाऱ्या वाहतूक समस्या कमी करणे आहे.

