(पुणे)
हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या प्रफुल्ल लोढा याला पिंपरी-चिंचवड परिसरातील बावधन पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. बावधन पोलीस ठाण्यात ३६ वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
बावधन पोलिसांनी न्यायालयात हस्तांतरित वॉरंट मागितले होते. मंजुरी मिळाल्यानंतर, शुक्रवारी सकाळी मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातून पोलिसांनी लोढाचा ताबा घेतला आणि अधिक तपासासाठी पुण्यात आणले.
प्राथमिक माहितीनुसार, २७ मे २०२५ रोजी, प्रफुल्ल लोढाने पीडित महिलेच्या पतीला नोकरी लावतो असे आमिष दाखवून तिला पुण्यातील बालेवाडी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये बोलावले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
हे प्रकरण केवळ एक नसून, याआधीही लोढाविरुद्ध मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यांमध्ये हनी ट्रॅप आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याने मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचे तपासात समोर आले होते. पोलिसांकडून या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून, लोढाच्या इतर संभाव्य गुन्ह्यांचीही माहिती घेतली जात आहे.
महिलेने तक्रारीत म्हटलेले आहे की, प्रफुल लोढाने तुझ्या पतीला नोकरीला लावतो, असे सांगून भेटायला बोलावले. २७ मे २०२५ रोजी लोढाने बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. तुझ्या पतीला नोकरीला लावायचे असेल, तर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील, असे सांगितले. महिलेने याला नकार दिला. तेव्हा लोढाने आता तुझीही नोकरी घालवेन, अशी धमकी दिली आणि हॉटेलच्या खोलीत बळजबरीने अत्याचार केला. या प्रकारानंतर महिला घाबरली. त्यानंतर १७ जुलै रोजी पोलिसांत तक्रार दिली होती.

