प्रसिद्ध रशियन मॉडेल आणि मिस युनिव्हर्स 2017 स्पर्धेतील स्पर्धक केसेनिया सर्गेव्हना अलेक्झांड्रोवाचे निधन झाले आहे. ती अवघ्या 30 वर्षांची होती. मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील ट्वेर ओब्लास्ट भागातील एम-9 महामार्गावर 5 जुलै 2025 रोजी झालेल्या भीषण रस्ता अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. तब्बल एका महिन्याच्या उपचारानंतर, 12 ऑगस्ट 2025 रोजी तिने मॉस्कोच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
कोण होत्या केसेनिया अलेक्झांड्रोवा?
केसेनियाचा जन्म 12 नोव्हेंबर 1994 रोजी मॉस्को येथे झाला होता. 2017 साली ‘मिस रशिया’ स्पर्धेत ती पहिली उपविजेती ठरली आणि त्यानंतर तिने ‘मिस युनिव्हर्स 2017’ स्पर्धेत रशियाचे प्रतिनिधित्व केले. ती टॉप-16 मध्ये पोहोचू शकली नाही, परंतु आपल्या सौंदर्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वामुळे तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले. शिक्षणाच्या बाबतीतही ती तितकीच उत्तम होती. तिने प्लेखानोव्ह इकॉनॉमिक युनिव्हर्सिटी येथून फायनान्समध्ये शिक्षण घेतले, तसेच मानसशास्त्रातही पदवी प्राप्त केली होती. केसेनिया एक प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट म्हणूनही कार्यरत होती.
अपघाताची घटना
5 जुलै रोजी केसेनिया आणि तिचे पती रझेव्हहून मॉस्कोकडे परतत असताना, त्यांच्या कारसमोर अचानक एक मोठे जंगली हरण (एल्क) आले. जोरदार धडकेमुळे एल्क कारच्या विंडशील्डला तोडून आत शिरले आणि केसेनियाच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्या वेळी केसेनिया प्रवासी सीटवर होती, आणि दोघांनीही सीटबेल्ट लावले होते. मात्र, कारच्या डिझाइनमधील त्रुटींमुळे एअरबॅग्जने योग्य वेळी काम केले नाही, ज्यामुळे दुखापत अधिकच गंभीर आणि मोठी झाली.
केसेनियाच्या निधनाची बातमी समजताच तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. सोशल मीडियावर तिच्या लाखो फॉलोअर्सनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. विशेष म्हणजे, तिने मार्च 2025 मध्ये विवाह केला होता, आणि त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.

