(मुंबई)
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक आणि रोजगाराच्या संधी यांचा विचार करून परिवहन विभागाकडून नवी स्कूल व्हॅन नियमावली तयार करण्यात आली आहे. ही नियमावली अंतिम करून तातडीने अधिसूचना जारी करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी दिले.
या नियमावलीत परिवहन समित्यांचे सक्षमीकरण, महिन्यातून एकदा समितीची बैठक घेणे तसेच प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नोडल अधिकारी नेमणे या तरतुदी असतील.
परिवहन आयुक्त कार्यालयात स्कूल व्हॅन संदर्भातील बैठकीत सरनाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुरक्षा आणि सोयीसुविधांनी युक्त अधिकृत स्कूल व्हॅन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यमान नियमांमध्ये सुधारणा केली जात आहे. शालेय व्हॅनचे भाडे मासिक तत्वावर आणि केवळ १० महिन्यांच्या कालावधीपुरतेच घेण्याची अटही यामध्ये असणार आहे.
केंद्र सरकारच्या स्कूल बस नियमावलीच्या धर्तीवर ही नवी स्कूल व्हॅन नियमावली तयार करण्यात आली आहे. १२+१ आसनक्षमतेपर्यंतची चारचाकी वाहने शालेय व्हॅन म्हणून मान्य केली जाणार असून ती बीएस-६ श्रेणीतील असणे बंधनकारक आहे. चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन व्यवस्था, स्टोरेज रॅक, आसनरचना, अग्निशमन अलार्म प्रणाली, वाहन ट्रॅकिंग यंत्रणा अशा आधुनिक सुरक्षाव्यवस्थांचा समावेश व्हॅनमध्ये असणार आहे.
शालेय बसचे भाडे परवडत नसल्यामुळे अनेक पालक अवैध रिक्षांचा पर्याय निवडतात. मात्र रिक्षांच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षितता आहे. दरवाजे बंद असणे, पिशव्या व साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा अशा सोयी व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत, असेही सरनाईक यांनी सांगितले.
या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकार, सहपरिवहन आयुक्त जयंत पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
अशी असेल नवी स्कूल व्हॅन :
- जीपीएस प्रणाली
- सीसीटीव्ही व डॅशबोर्ड स्क्रीन
- अग्निशमन अलार्म यंत्रणा
- दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म
- ताशी ४० किमी वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर
- पॅनिक बटण
- आपत्कालीन दरवाजे
- लहान मुलांसाठी प्रवेश पायरी
- गाडीच्या छतावर शाळेचे नाव

