(ठाणे)
राज्यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, राजकारणी, मंत्री-आमदार तसेच आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या TWJ कंपनीचा मालक व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमीत बालम यांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या या घोटाळ्याची रक्कम सुमारे १,२०० कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
राज्यभरातील आठ जिल्ह्यांतून समीर नार्वेकरविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत्या. अनेक दिवस तो पोलिसांच्या हाती लागत नसल्याने तपास यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे गुजरातमध्ये सापळा रचत आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईचे नेतृत्व तपास अधिकारी माधवी राजेकुंभार आणि त्यांच्या पथकाने केले.
TWJ कंपनीने विविध आकर्षक योजनांच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक गोळा केली होती. काही काळानंतर कंपनीने अचानक व्यवहार थांबवले आणि गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणात काही दिवसांपूर्वी रत्नागिरी पोलिसांनी कंपनीचा संचालक संकेश घाग याला अटक केली होती. त्यानंतर तपासाला गती मिळाली आणि आता मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर व त्याची पत्नी अटकेत आल्याने या आर्थिक घोटाळ्याचा खरा आकडा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पती-पत्नीला अटक झाल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, येत्या काळात आणखी अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.
TWJ घोटाळ्यात अनेक मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींची गुंतवणूक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी संचालक, एजंट आणि मध्यस्थांचा सहभाग उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपींची सखोल चौकशी सुरू असून फसवणुकीचे नेमके आर्थिक व्यवहार आणि रक्कम लवकरच स्पष्ट होणार आहे.

