(मुंबई)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे बुधवारी ‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ (MNLU) मुंबई’ प्रकल्पाचा शुभारंभ व कोनशिला अनावरण सोहळा पार पडला. या वेळी भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे प्र-कुलगुरू न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती संदीप मर्ने, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिलीप उके, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “२०१४ मध्ये महाराष्ट्रात तीन राष्ट्रीय विधि विद्यापीठे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला गेला. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले, जिथे तीन राष्ट्रीय विधि विद्यापीठे कार्यरत आहेत. या उपक्रमासाठी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तसेच सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मनःपूर्वक आभार.”
मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे संकुल आता वास्तवात
फडणवीस यांनी सांगितले की, “तीन विद्यापीठांपैकी मुंबईतील विद्यापीठाकडे स्वतःचे संकुल नव्हते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज त्या संकुलाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. या विद्यापीठाला लवकरच अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे रूप दिले जाईल.महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ केवळ देशा.,” असे मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आज उद्योग, व्यवसाय, सामाजिक जीवन आणि राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये शिक्षणाची सांगड आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण मानव संसाधन हे शिक्षणातूनच तयार होते आणि याच दृष्टीने राज्य सरकार हे प्रकल्प राबवत आहे.”
फडणवीस यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी शैक्षणिक धोरणांतर्गत नवी मुंबईत ‘एज्यु सिटी’ उभारण्याचे मोठे काम सुरू आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाच्या १२ विद्यापीठांचा समावेश असून त्यापैकी सात विद्यापीठे लवकरच कार्यरत होतील. मुंबई आणि नवी मुंबई परिसरात शिक्षण व नवोन्मेषाचे जागतिक केंद्र निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.”
“भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे आपल्या न्यायव्यवस्थेलाही जागतिक दर्जाशी सुसंगत बनवणे आणि विधि क्षेत्रात सर्वोत्तम मानव संसाधन निर्माण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मुंबई प्रकल्प ही दिशा दाखवणारी ऐतिहासिक पायरी ठरेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

