(पालघर)
तारापूर औद्योगिक वसाहतीतील मेडली फार्मास्युटिकल कंपनीत आज दुपारी साधारण अडीच ते तीनच्या दरम्यान घडलेल्या भीषण गॅस गळतीची बातमी समोर आली. प्लॉट क्रमांक F‑13 येथील नायट्रोजन रिऍक्शन टँकमधील गॅस गळतीमुळे सहा कामगार बेशुद्ध पडले—त्यापैकी चार जागीच मृत्युमुखी पडले, तर दोन गंभीर अवस्थेत आहेत, त्यांना तत्काळ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावे: कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव. उपचाराधिन असलेले अत्यवस्थ कामगार: रोहन शिंदे आणि निलेश हाडळ. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर बोईसर मधील खासगी रुग्णालयात तातडीचे उपचार सूरु आहेत.
या गॅस गळतीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, स्थानिक प्रशासन, फॉरेंसिक तज्ज्ञ आणि औद्योगिक सुरक्षा आयुक्ती यंत्रणांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात सुरक्षा नियमांचे उल्लंघन किंवा यंत्रणेतील तांत्रिक दोषांमुळे घडला असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बोईसर तारापूर एमआयडीसी वायू गळती, कारखान्यांमध्ये घडणाऱ्या दुर्घटना असे प्रकार वारंवार सुरूच असल्याने या एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागत असल्याचे चित्र आहे.

