(पुणे)
विवाह जुळविण्याच्या ऑनलाईन संकेतस्थळावरून ओळख झालेल्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत पुण्यातील पिंपरी भागातील एका महिलेची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २०२३ पासून १९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला असून, याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची आरोपी तरुणाशी ओळख एका ऑनलाईन विवाह संकेतस्थळावरून झाली. ओळखीनंतर दोघांमध्ये संवाद वाढला आणि नातं मैत्रीतून लग्नाच्या वचनापर्यंत पोहोचलं. आरोपीने लग्नाचे आश्वासन देत महिलेचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने आपल्या आई-वडिलांच्या गंभीर आजारपणाचे, तसेच स्वतःच्या आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत वेळोवेळी पैशांची मागणी केली. महिलेनेही त्याच्या विश्वासावर बँक ट्रान्सफर, क्रेडिट कार्ड आणि धनादेशाद्वारे एकूण ₹14,44,700 इतकी रक्कम दिली.
फक्त तीन लाखांची परतफेड, उर्वरित रक्कमेबाबत टाळाटाळ
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने या पैकी केवळ ₹3,93,091 इतकी रक्कम परत केली. मात्र उर्वरित ₹10,51,609 परत न करता तो महिलेला टाळू लागला. एवढेच नव्हे, तर लग्न करण्यासही स्पष्ट नकार दिला, त्यामुळे महिलेची आर्थिक आणि भावनिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर महिलेने अखेर पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणामुळे विवाह संकेतस्थळांच्या माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्या, व्यक्ती सक्रिय असल्याचे संकेतही या घटनेतून मिळत आहेत. फसवणुकीच्या अशा घटनांमुळे ऑनलाईन माध्यमातून ओळख करताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मॅट्रिमोनियल (विवाह जुळवणी) साइट्सवरून फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना, विशेषतः आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधानता बाळगणे आवश्यक आहे. फसवणूक टाळण्यासाठी खालील काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
खोटे प्रोफाइल: मॅट्रिमोनियल साइट्सवर बनावट प्रोफाइल तयार करून, लोकांना विश्वासघातकी पद्धतीने फसवले जाते.
आर्थिक मागणी: अनोळखी व्यक्ती, “अमेरिकेतून गिफ्ट पाठवले आहे”, “कस्टम ड्यूटी भरा” किंवा “इमर्जन्सी आहे” अशा प्रकारे पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.
भावनिक फसवणूक: काहीवेळा, अनोळखी व्यक्ती प्रेम किंवा सहानुभूतीचा दिखावा करून, जवळची व्यक्ती आजारी असल्याचे सांगून पैसे उकळतात, आणि मग संपर्क तोडतात.
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक: काही प्रकरणांमध्ये, मॅट्रिमोनियल साइट्सवरील ओळखीच्या व्यक्ती क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगतात आणि फसवणूक करतात.
नोकरीचे आमिष: काहीवेळा, नोकरी किंवा व्हिसाच्या नावाखाली फसवणूक केली जाते.

