(मुंबई)
महाराष्ट्रातील मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यभर विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत राज्यातील तब्बल 9 कोटी 48 लाखांहून अधिक मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घराघरांत जाऊन माहिती तपासणार आहेत. ही प्रक्रिया जून 2026 पासून सुरू होऊन ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील.
महाराष्ट्रातील 9.69 कोटी मतदारांची पडताळणी
भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात एकूण 9,69,88,493 मतदारांची माहिती तपासली जाणार आहे. यासाठी 1,00,253 BLO नियुक्त करण्यात आले असून सध्या 72 टक्के मॅपिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दुबार नावे आणि मृत मतदारांची नोंद हटविण्यावर भर
गेल्या दोन दशकांत राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दुबार नावे, स्थलांतरित मतदारांची अपूर्ण माहिती तसेच मृत व्यक्तींची नावे कायम असल्याची शक्यता निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. विशेषतः शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने अनेक मतदारांनी नवीन ठिकाणी नाव नोंदवले, मात्र जुन्या पत्त्यावरून नाव कमी केले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांनी सांगितले की, “भाड्याने दुसरीकडे राहणाऱ्या नागरिकांनी फॉर्म क्रमांक 6 मध्ये नवीन पत्त्याची नोंद करावी. ज्या पत्त्यावर फॉर्म भरला जाईल तो पत्ता ग्राह्य धरला जाईल. नंतर मूळ गावी परत गेल्यास नाव पुन्हा स्थलांतरित करता येईल. त्यामुळे दुबार नोंदणी होणार नाही.”
BLO घरभेटी कधीपासून?
30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत BLO घरभेटी देऊन मतदारांना पूर्वभरलेले गणना प्रपत्र (Pre-filled Enumeration Form) वाटणार आहेत. या प्रपत्रात सध्याची माहिती तसेच 2002-2004 मधील पुनरीक्षणावेळची माहिती नमूद असेल. मतदारांना नवीन छायाचित्र सादर करण्याची सुविधाही उपलब्ध असेल. जर घर बंद आढळले, तर संबंधित घराला किमान तीन वेळा भेट दिली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदारांना माहिती ऑनलाइन पद्धतीनेही भरता येणार आहे.
5 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी, 8 सप्टेंबरपर्यंत हरकती
मतदारांकडून प्राप्त माहितीनंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 8 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्याची मुदत असेल. ज्या मतदारांची माहिती जुन्या नोंदींशी जुळणार नाही किंवा त्रुटी आढळतील, त्यांना आयोगाकडून नोटीस पाठवली जाईल.
आधार कार्डाबाबत आयोगाचे स्पष्ट मत
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, आधार कार्ड हे केवळ ओळखीचा पुरावा (Proof of Identity) म्हणून ग्राह्य धरले जाईल. मात्र, ते नागरिकत्वाचा पुरावा (Proof of Citizenship) मानले जाणार नाही. मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आधार कार्ड हे ओळखीचे प्रमाणपत्र आहे, नागरिकत्वाचे नाही. त्यामुळे आधारासाठी स्वतंत्र पर्यायी कॉलम उपलब्ध करून देण्यात आला आहे.”
राजकीय पक्षांनाही आवाहन
मतदार याद्या अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन आयोगाने सर्व राजकीय पक्षांना केले आहे. सध्या राज्यात 1,93,558 BLA नियुक्त करण्यात आले आहेत. “कायद्यानुसार आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास कोणाचेही नाव विनाकारण वगळले जाणार नाही. मतदार यादीतील बदलांची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध असेल आणि प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवली जाईल,” असेही चोकलिंगम यांनी स्पष्ट केले.

