(मुंबई)
महाराष्ट्र पोलीस दलात 15,631 पदांची मेगाभरती होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली असून, भरती प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने आता अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. विशेष म्हणजे, सन 2022 आणि 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकवेळ मर्यादित संधी देण्यात आली असून, ते देखील या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.
रिक्त पदांचा तपशील (एकूण 15,631 पदे):
| पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
|---|---|
| पोलीस शिपाई | 12,399 |
| पोलीस शिपाई (चालक) | 234 |
| बॅण्डस्मन | 25 |
| सशस्त्र पोलीस शिपाई | 2,393 |
| कारागृह शिपाई | 580 |
या पदांची भरती 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीतील रिक्त जागांसाठी केली जाणार आहे.
भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे निर्णय:
-
वयोमर्यादा शिथिलता: 2022 आणि 2023 मध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ मर्यादित संधी देण्यात येणार आहे.
-
परीक्षा पद्धत: या भरती प्रक्रियेत OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, घटकस्तरावरून भरती राबविण्याची परवानगी देण्यात आली आहे.
-
परीक्षा शुल्क:
-
खुला प्रवर्ग: ₹450
-
मागास प्रवर्ग: ₹350
हे शुल्क आधीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच असेल आणि भरती प्रक्रियेसाठी खर्च करण्यात येईल.
-
-
सेवापुरवठादाराची नियुक्ती:
अर्ज स्वीकृती, दस्तऐवज छाननी व इतर तांत्रिक बाबींसाठी बाह्य सेवापुरवठादार कंपनीची नियुक्ती केली जाईल. यासाठी अधिकार अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण आणि विशेष पथके), मुंबई यांना दिले आहेत.
महाराष्ट्र पोलीस दलात भरतीसाठी इच्छुक हजारो उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. विशेषतः वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी दिली गेलेली एकवेळ संधी ही स्वागतार्ह आहे. लवकरच या भरतीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

