(मुंबई)
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन व ध्वजारोहणाची संधी देण्याची मागणी करणारे मंत्री भरत गोगावले यांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्हा मुख्यालयात आयोजित शासकीय कार्यक्रमात भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (२१ जानेवारी) शासन परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे यंदा रायगडमध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करण्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची संधी हुकली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचे नेते गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तटकरे दोघांनीही दावा सांगितला आहे. त्यामुळे सरकारला वर्ष उलटून गेल्यानंतरही हा तिढा सुटलेला नाही. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन जवळ आला की या वादात पुन्हा ठिणगी पडते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आतापर्यंत तटकरे यांनाच रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान मिळालेला आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची नाराजी कायम असून, हा तिढा अद्याप सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाने प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजवंदनाबाबत परिपत्रक काढले आहे.
परिपत्रकानुसार, नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. रायगड पालकमंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या भरत गोगावले यांना प्रथमच प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनाचा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे, मंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजवंदनाच्या यादीत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही.
७७ वा प्रजासत्ताक दिन: राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन
देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथे सकाळी ९.१५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजवंदन समारंभ पार पडेल. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये पालकमंत्री, मंत्री व राज्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे.
राजशिष्टाचार विभागाच्या परिपत्रकानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्यात, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यात, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अहिल्यानगर जिल्ह्यात, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बीड जिल्ह्यात, तर सांगली जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल.
जिल्हानिहाय ध्वजवंदन करणारे मंत्री:
मुंबई शहर – मंगल प्रभात लोढा
मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार
पालघर – गणेश नाईक
जळगाव – गुलाबराव पाटील
अमरावती – दादाजी भुसे
यवतमाळ – संजय राठोड
रत्नागिरी – उदय सामंत
धुळे – जयकुमार रावल
जालना – पंकजा मुंडे
नांदेड – अतुल सावे
चंद्रपूर – डॉ. अशोक उईके
सातारा – शंभुराज देसाई
वाशिम – दत्तात्रय भरणे
लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
नंदुरबार – योगेश कदम
सोलापूर – जयकुमार गोरे
हिंगोली – नरहरी झिरवाळ
भंडारा – संजय सावकारे
छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
धाराशिव – प्रताप सरनाईक
बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग – नितेश राणे
अकोला – आकाश फुंडकर
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर
गडचिरोली – ॲड. आशिष जयस्वाल
वर्धा – डॉ. पंकज भोयर
परभणी – मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
गोंदिया – इंद्रनील नाईक

