(मुंबई)
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही दिवसांत हा शपथविधी सोहळा पार पडला. राजभवनातील सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
कुटुंबावर आलेले दु:ख बाजूला ठेवत पक्षाच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारत सुनेत्रा पवार यांनी धीरोदात्तपणे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी पार पडला. यासह महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची नोंद झाली आहे.
शपथविधीच्या वेळी अजित पवार यांचे स्मरण करत सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि समर्थकांनी “एकच वादा अजितदादा” आणि “अजित पवार अमर रहे” अशा घोषणांनी राजभवनाचा परिसर दुमदुमून टाकला.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या होत्या. सकाळी देवगिरी निवासस्थानी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. जनभावना आणि पक्षाची गरज लक्षात घेऊन या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झाले.
त्यानंतर सर्व नेते विधानभवनात दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात अजित पवार यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहण्यात आली. पुढे झालेल्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आणि सत्तेतील जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे.

